लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोरोना नियमांचे पालन करून लोककलावंतांना कला सादर करण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी शिराळा तालुका सांस्कृतिक कला मंचच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सर्व कलावंतांची कौटुंबिक गुजराण कलेवर आहे. कोरोनाकाळात कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोककला, लोकसंगीत, ऑर्केस्ट्रा, बॅन्ड, बँजो, ललितकला क्लासेस, नाट्य, वाघ्यामुरळी, पोतराज, वासुदेव यांसह विविध लोककलावंतांना त्रास सहन करावा लागत आहे. इतर कोणतेही काम नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक कलांना कोरोनाचे नियम पाळून कला सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी.
वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य अनंत सपकाळ, मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक समिती सदस्य अभिनेते रंगराव घागरे, शिराळा सांस्कृतिक कलामंच अध्यक्ष विक्रम दाभाडे, वैजनाथ चौगुले, शिवाजीराव चौगुले, उल्हास कांबळे, डॉ. शैलेश माने, सलिका पठाण, रणजीत चव्हाण आदी उपस्थित होते.