सांगली : मुख्य रस्त्यांवरच भरत असलेल्या आठवडा बाजारामुळे शनिवारी दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक पोलीस असूनही ही कोंडी सोडविता येत नसल्याचे दिसून आले.
सांगलीत अनेक वर्षांपासून हा बाजार भरत आहे. सुरुवातीला महापालिकेच्या शाळा क्र. १ च्या परिसरापासून बालाजी चौक, कापड पेठ या मार्गावर बाजार भरत होता. आता हळूहळू तो चारही दिशेला पसरत आहे. भारती विद्यापीठाच्या कुंपणालगत रस्त्यावर, हरभट रोड, टिळक चौकापासून बालाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत, गणपती मंदिरापासून टिळक चौकापर्यंत हा बाजार पसरला आहे. त्यामुळे या सर्वच मार्गावरील वाहतुकीची कोंंडी होत आहे. वाहतुकीची ही समस्या सोडविणे आता कठीण झाले आहे. वाहतूक पोलीस नियोजन करीत असले, तरी त्यांना आता ही गर्दी नियंत्रणात आणणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन या मार्गांवरुन ये-जा करावी लागत आहे.