लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संगीत क्षेत्रात मला मिळालेल्या यशात सर्व सहकारी कलाकारांचा हात आहे. दांडिया किंवा ऑर्केस्ट्रा लोकप्रिय करण्यामागे सामूहिक प्रयत्न आहेत, असे मत कलाकार व हळद व्यापारी शरद शहा यांनी व्यक्त केले.
आर्टिस्ट असोसिएशन ऑफ सांगलीच्यावतीने शहा यांना असोसिएशनचे अध्यक्ष अतुल शहा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सीमा शरद शाह यांचा सत्कार भक्ती साळुंखे यांनी केला. चाळीस वर्षांपूर्वी सांगलीमध्ये ऑर्केस्ट्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शरद शहा यांनी आजपर्यंत हजारो उदयोन्मुख गायक-गायिका, वादक आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची संधी दिली. संगीत क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल संघटनेने त्यांचा मानपत्र देऊन गौरव केला.
रोटरी क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, शरद शहा यांच्या स्वरयात्रा या मराठी गाण्याच्या
कार्यक्रमात मी स्वत: निवेदक म्हणून काम करत होतो. त्यांनी अनेक कलाकार घडविले व मोठे केले. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे.
मानपत्राचे वाचन रश्मी सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष आनंद कमते यांनी केले. सूत्रसंचालन विशाल कुलकर्णी यांनी केले. यावेळी धनंजय गाडगीळ, किरण ठाणेदार, संजय भिडे, प्रदीप कुलकर्णी विजय शहा, हार्दिक शहा, अरुण अभ्यंकर आदी उपस्थित होते.