दिघंची : आटपाडी तालुक्यातील विठलापूर येथे डंपरमुळे तुटलेल्या विजेच्या तारांत अडकून रस्त्यावर आपटल्याने सातारा जिल्ह्यातील कृषी साहाय्यक शाहीर वसंत बनसोडे (वय ५०, रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा) जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
सध्या दिघंची-हेरवाड महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विठलापूर येथे ओढ्याजवळ बाजूपट्ट्यांवर डंपरच्या साहाय्याने मुरुम टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी सातारा जिल्ह्यातील देवापूर येथील शाहीर बनसोडे दुचाकीवरून आटपाडीकडे निघाले होते. मुरूम भरलेल्या डंपरचा मागील हौदा वर घेताना चालकाला अंदाज न आल्याने रस्त्याच्या वरच्या बाजूवरून जाणारी विजेची तार तुटली आणि अचानक समोर आलेल्या तारेत अडकून शाहीर बनसोडे दुचाकीवरून रस्त्यावर पडले. दगडावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने ते जागीच ठार झाले.
शाहीर बनसोडे आटपाडी येथे कृषी साहाय्यक होते. डंपरचालकाच्या चुकीमुळे त्यांना प्राण गमवावा लागला. दिघंची-आटपाडी रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. कृषी साहाय्यकाचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.