सांगली : गेल्या तीन वर्षांपासून असलेले जिल्हा बॅँकेवरील प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे. बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज (सोमवारी) जाहीर झाल्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. महिन्याभराच्या कालावधीनंतर बॅँकेचा कारभार पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची नियुक्ती झाली असून, सोमवारी सायंकाळी त्यांना याबाबतचे पत्र प्राप्त झाले. निवडणुकीचा कार्यक्रमही आता अधिकृतरित्या जाहीर झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील संचालक मंडळ २९ मार्च २०१२ मध्ये बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून बॅँकेवर प्रशासकराज अस्तित्वात आहे. बरोबर तीन वर्षांनंतर आता हे प्रशासकराज संपुष्टात येत आहे. ४ एप्रिलपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असून, ६ मे रोजी नवे संचालक मंडळ याठिकाणी अस्तित्वात येणार आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीबाबत अधिकृत आदेश आज सोमवारी प्राप्त झाले. सायंकाळी भाऊसाहेब गलांडे यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. प्रशासकीय पातळीवर जशा हालचाली सुरू झाल्या आहेत, तशाच हालचाली आता राजकीय पातळीवरही सुरू झाल्या आहेत. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, एकूण २ हजार २०७ इतकी मतदारसंख्या आहे. सर्वाधिक मतदार मिरज आणि वाळवा तालुक्यात आहेत. (प्रतिनिधी)दोन तालुके ठरणार निर्णायकमिरज आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे या तालुक्यांमधील कौलच निर्णायक ठरणार आहे. वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचे, तर मिरज तालुक्यात मदन पाटील यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भूमिका या निवडणुकीत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
प्रशासकराज संपुष्टात येणार
By admin | Updated: March 31, 2015 00:23 IST