सांगली : सांगली बाजार समिती संचालक मंडळाची मुदत २६ फेब्रुवारीला संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव पणन मंडळाकडे गेला असून, त्यावर मंगळवार, ६ एप्रिल रोजी पणनमंत्री बाळासाहेब पाटील निर्णय घेणार आहेत. यामुळे मुदतवाढ मिळणार की, प्रशासकाची नियुक्ती होणार, याकडे व्यापारी, शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकरी संघटना सहकार आघाडीप्रमुख संजय कोले यांनी जिल्हा उपनिबंधक नीळंकठ करे यांच्याकडे सांगली बाजार समितीवर प्रशासक का नेमला नाही, अशी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर बाजार समिती संचालक मंडळाने मुदतवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. यातूनच पणनमंत्री पाटील आणि पणन संचालकांनी निर्णय घेण्यासाठी ६ एप्रिल रोजी बैठक बोलविली आहे. या बैठकीत राज्यातील अन्य बाजार समित्यांबाबतही निर्णय अपेक्षित आहे. संचालकांना मुदतवाढ देणार की प्रशासकांची नियुक्ती होणार, याची संचालक मंडळासह व्यापारी, शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.
बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील म्हणाले की, संचालक मंडळाची मुदत २६ फेब्रुवारीला संपणार होती. त्यापूर्वीच कोरोनाच्या फैलावामुळे निवडणुका पुढे गेल्या आहेत. पणन संचालकांकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर ६ रोजी निर्णय होणार आहे. संचालकांना मुदतवाढ मिळेल, असेच दिसत आहे.