जत : मार्च महिन्यात दिलेले टॅँकर मागणीचे प्रस्ताव एप्रिल महिना लागला तरी मंजूर झाले नाहीत. तालुक्यात भयानक पाणीटंचाई जाणवत असताना प्रशासकीय यंत्रणा ठप्प आहे. महसूल प्रशासनाने जनतेला पिण्याचे पाणी देण्यासाठी तरी तत्परता दाखवावी, अशी सूचना जत तालुका टंचाई आढावा बैठकीत करण्यात आली. या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप होते. पाणीटंचाई कालावधित विहीर, बोअर अधिग्रहण आदेश स्वीकारत नसलेल्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत. डफळापूर (ता. जत) प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या कामास विरोध करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून काम पोलिस बंदोबस्तात पूर्ण करावे, अशी सूचना करण्यात आली. तालुक्यात सध्या ऐंशी टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. आणखी अठरा टॅँकरची मागणी आहे. परंतु प्रशासनाने फक्त आठ टॅँकरची मागणी आहे, असे दाखविले आहे. टंचाई कालावधित प्रशासकीय यंत्रणा सतर्क नाही. ग्रामसेवक, गाव कामगार तलाठी नेमणूक असलेल्या गावात रहात नाहीत. त्यामुळे त्यांना स्थानिक अडचणी समजत नाहीत. जुजबी माहिती घेऊन उपाय-योजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. टंचाई कालावधित घरोघरी टॅँकरने पाणी पुरवठा करू नये. पन्नास किंवा शंभर आणि त्यापेक्षा जादा लोकवस्ती असेल तेथेच टॅँकरने पाणी पुरवठा करावा. शासकीय खर्चातून टॅँकरद्वारे खासगी ठिकाणी पाणी देणाऱ्या टॅँकर चालकांवर व संबंधित ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रांताधिकारी अशोक पाटील, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी ओमराज गहाणे, तालुका भाजप अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी व प्रमोद सावंत, उमेश सावंत, बसवराज बिराजदार, संजयकुमार सावंत, आप्पा दुधाळ, अजितकुमार पाटील, शिवाजीराव ताड, मारुती पवार उपस्थित होते. (वार्ताहर) ‘जीपीएस’ कुचकामी : बिले काढू नका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती देऊन सभागृहात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, मी स्थानिक आमदार असून, मला सर्व माहिती आहे. पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरवरील जीपीएस यंत्रणा कुचकामी आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याशिवाय टॅँकरची बिले काढू नयेत, असे लेखी पत्र आ. विलासराव जगताप यांनी प्रशासनाला दिले.
‘टंचाई’त प्रशासकीय यंत्रणा ठप्प
By admin | Updated: April 3, 2016 23:48 IST