सांगली : सांगली-मिरजेत गॅस्ट्रोचे आतापर्यंत दहा बळी गेल्याचे प्रसारमाध्यमातून सांगण्यात आलेले वृत्त निराधार असून, यामध्ये आतापर्यंत तिघांचा बळी गॅस्ट्रोने गेल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला. इतर सातजणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला आहे. आतापर्यंत गॅस्ट्रोचे ४७७ रुग्ण आढळले असून, यामधील ३७७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. ८० रुग्णांवर आज विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मिरजेत गॅस्ट्रोची साथ आली असली तरी, ती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. यासंदर्भात घरोघरी मेडिक्लोर औषधांचे वाटप सुरु करण्यात आले असून, नागरिकांंनी घाबरुन जाण्यासारखी स्थिती नसल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे व महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, मिरजेमध्ये बसस्थानक परिसरात आॅगस्टमध्ये गॅस्ट्रोचा रुग्ण आढळला. त्या ठिकाणी सर्व्हे केल्यानंतर पाण्याच्या कनेक्शनमध्ये दोष असल्याचे आढळून आले. त्यानंतर या ठिकाणच्या पाईप बदलण्यास सुरुवात करण्यात आली. चारशे कर्मचाऱ्यांकडून २१ पाणी कनेक्शन्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७६ ठिकाणी दूषित पाणी जात असल्याचे आढळून आले. मिरजेमध्ये १९५० पूर्वीच्या पाईपलाईन असून, १९६९ ची ड्रेनेज व्यवस्था आहे. या पाईप चाळीस वर्षांनंतर बदलणे आवश्यक असताना, त्या बदलण्यात आलेल्या नाहीत. यासाठी आता ३५ कोटी ६७ लाख रुपयांच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली असून, त्याच्या निधीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. यापुढे घरोघरी आम्ही मेडिक्लोर औषधांचे वाटप सुरु केले असून, टीसीएल पावडरचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रोची साथ आली असली तरी, ती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी दूषित पाण्याच्या वापरामध्ये नागरिकांकडूनही निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आले आहे. लोखंडे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात कोठेही गॅस्ट्रोची साथ नाही. गेल्या सात महिन्यात सात रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पाणी शुध्दीकरणावर अधिक भर देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)दोषींवर कारवाई : कुशवाहगॅस्ट्रो साथीला कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदा गॅस्ट्रो आणखी पसरणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असून, ही साथ पूर्णपणे संपल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिला.
प्रशासन म्हणते...गॅस्ट्रोचे दहा नव्हे, तीनच बळी!
By admin | Updated: November 27, 2014 00:10 IST