लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कार्वे (ता. खानापूर) येथे स्थायिक झालेल्या कांचनपूर प्रकल्पगस्तांच्या मदतीला प्रशासन धावले असून, या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यासाठी विटा महसूलने महाशिवरात्रीला सुट्टीच्या दिवशी ‘प्रशासन आपल्या दारी’ ही विशेष मोहीम राबवली. यावेळी प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाच्या सातबारावरील वर्ग २ हा शेरा कमी करून वर्ग १ करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना दुबार रेशनकार्डचे वाटपही करण्यात आले.
कार्वे येथे कांचनपूर प्रकल्पग्रस्त वसाहत असून, या वसाहतीतील लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी गुरूवारी महाशिवरात्रीची सुट्टी असूनही महसूल कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेत कांचनपूर वसाहतीत विशेष मोहीम राबवली.
कांचनपूर (कार्वे) वसाहतीत प्रकल्पग्रस्तांना १०९ भूखंडांचे वाटप केले आहे. मात्र, वाटप केलेल्या भूखंडांवरील ७/१२ उताऱ्यावर वर्ग २ या शर्तीचा शेरा कायम होता. त्यामुळे हा शेरा कमी करून वर्ग १ करण्यासाठी शिबिर घेण्यात आले. त्यावेळी प्रशासनाने ४५ प्रकल्पग्रस्तांचे अर्ज भरून घेतले. यावेळी पुनर्वसन वसाहतीतील प्रकल्पग्रस्तांनी तहसीलदार शेळके यांना पाणी, वीज तसेच दुबार रेशनकार्डबाबत असलेल्या समस्या सांगितल्या.
यावेळी तहसीलदारांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करत १५ दुबार रेशनकार्डचे वाटप केले तर ७/१२ वरील वर्ग २ हा शेराही कमी करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून घेत वर्ग १ हा शेरा कायम ठेवला. प्रकल्पग्रस्तांना नवीन ७/१२ लवकरच देण्यात येणार असल्याचे तहसीलदार शेळके यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांच्या पर्यवेक्षणाखाली ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. यावेळी विटाचे मंडल अधिकारी मोहन पाटोळे, गाव कामगार तलाठी धनश्री कदम, स्वस्त धान्य दुकानदार दादासाहेब जाधव, पुरवठा विभागातील कर्मचारी अमोल कदम, राहुल लोहार यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.