सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी व झरे येथे अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक आटपाडी तालुक्यात गस्तीवर हाेते. यावेळी चांदणी चौक, करगणी येथे इम्रान युनूस इनामदार (वय २१) याच्यावर कारवाई करत २० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. नरवीर उमाजी चौक, करगणी येथे दुसरी कारवाई करत उज्वला अरुण निळे या महिलेकडून ४० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. झरे येथेही पोलिसांनी कारवाई करत नाना बाळू चव्हाण (वय ३१) यास ताब्यात घेत, देशी दारूच्या १३ बाटल्या, टॅंगो पंच ३७ बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तीन कारवाईत १० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीरज उबाळे, अच्युत सूर्यवंशी, मच्छिंद्र बर्डे, सचिन कुंभार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.