मिरज : मिरजेतील मंगळवार पेठेत अक्रम शेख या तरुणाच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी मोअज्जम ऊर्फ मोजा शेख (वय २७ रा. मंगळवार पेठ, मिरज) याने मंगळवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली.
मोअज्जम शेख व साथीदारांनी वैमनस्यातून चार वर्षांपूर्वी मंगळवार पेठेतील एका कॅरम क्लबमध्ये गावठी पिस्तुलाने गोळ्या घालून व कोयत्याने वार करून अक्रम शेख याचा भरदिवसा खून केला होता. याप्रकरणी मोअज्जमसह दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. कोरोना साथीमुळे महिन्यापूर्वी मोअज्जम याची पॅरोलवर सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर त्याने विवाह केला होता. गेले आठ दिवस तो घरात कोणाशी बोलत नव्हता. मंगळवारी त्याने खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.