इस्लामपूर : शहराचे तत्कालीन नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या जितेंद्र बापू सूूर्यवंशी (वय ३०, बुरूड गल्ली, इस्लामपूर) या आरोपीस दोषी धरून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी त्याला ७ वर्षे सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास सूर्यवंशी याला ४ महिने साधा कारावास भाेगावा लागणार आहे.
याबाबत सुभाष यशवंत सूूर्यवंशी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. १४ सप्टेंबर २०१६ रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ते सिद्धनाथ रामचंद्र सावंत यांच्या दुचाकीवरून अंबिका उद्यानापासून घरी परतत होते. यावेळी आरोपी जितेंद्र सूर्यवंशी याने पोस्ट कार्यालय परिसरात पाठीमागून येऊन त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सर्वजण खाली पडले. सुभाष सूर्यवंशी आरोपी जितेंद्र सूर्यवंशी याला उठवण्यास गेले असता जितेंद्र याने त्याच्याजवळ असणाऱ्या पिशवीतून धारदार कोयता काढत मला रिक्षा देत नाहीस काय, तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत कोयत्याने कानाजवळ आणि गालावर वार केला.
यावेळी सिद्धनाथ सावंत याने जितेंद्र सूर्यवंशी याला मिठी मारून थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही जितेंद्र सूर्यवंशी याने कोयत्याने वार केले. त्यामध्ये सावंत आणि सुभाष सूर्यवंशी यांच्या दोघांच्याही हाताला दुखापत झाली. यावेळी आरडाओरडा केल्याने जितेंद्र सूर्यवंशी हा पळून गेला होता.
या खटल्याची सुनावणी न्या. मुनघाटे यांच्यासमोर झाली. मुख्य जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, सहायक सरकारी वकील रणजित पाटील यांनी फिर्यादीतर्फे काम पाहिले. सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. माजी सरकारी वकील सतीश पाटील यांनी फिर्यादी पक्षाला कामकाजात मदत केली. पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे, पोलीस नाईक संदीप शेटे यांनी खटल्याच्या कामकाजात सरकार पक्षाला मदत केली.
फोटो - ०२०२२०२१-आयएसएलएम- जितेंद्र सूर्यवंशी