दत्ता पाटील -तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविण्यासाठी राजकीय पक्षांकडून हालचाली गतिमान होताना दिसून येत आहेत. १ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानातून गावकारभाऱ्यांच्या अस्तित्वाबरोबरच तालुक्याच्या नेतृत्वाचा फैसलाही होणार आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपचे नेतेही सरसावले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींत तूर्तास तरी आबा आणि काका गटात दुरंगी लढत होईल, असेच चित्र आहे. पॅनेलची जुळवाजुळव करण्यापासून संभाव्य उमेदवारांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वच गटांकडून यंत्रणा राबविली जात असल्याचे दिसून येत आहे. तासगाव तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. १३ आॅक्टोबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा एक नोव्हेंबरला फैसला होणार आहे.ही निवडणूक गावकारभाऱ्यांसाठी अस्तित्वाची ठरणारी आहेच, किंंबहुना नेत्यांचे राजकीय वर्चस्व दाखवून देणारी ठरणार आहे. बहुतांश ग्रामपंचायतींवर सद्यस्थितीत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे आबा आणि काका गटाच्या माध्यमातून बहुतांश ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. विसापूर, गव्हाण, सावळजमध्ये राष्ट्रवादीअंतर्गत दोन गट आहेत. तसेच येळावी, नागाव कवठे, जुळेवाडी या गावांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या गावांत तिरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १२ गावे सरपंच पदासाठी आरक्षित आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ६, तर महिलांसाठी ७ गावे आरक्षित आहेत. अनुसूचित जातींसाठी ३, तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी २ गावांत सरपंचपद आरक्षित आहे. खुल्या प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित असणाऱ्या २१ गावांत मोठी चुरस आहे. तसेच आरक्षित जागांवर उमेदवार उभा करण्यासाठी सभाव्य उमेदवारांचे दाखले, कागदपत्रे गोळा करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धावपळ सुरु असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: कंबर कसली आहे. नगरपालिकेपाठोपाठ ग्रामपंचायतींवर ताबा मिळवण्यासाठी खासदारांनी गावन्गाव पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी गळ टाकला जात आहे. दुसरीकडे आबा गटाकडूनही तालुक्यातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यक्षेत्रातील गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीची हलगी चांगलीच तापली असून, लवकरच आरोप-प्रत्यारोपांनी हलगी वाजण्यास सुरुवात होणार आहे.या गावांवर नेत्यांचा फोकस या निवडणुकीत मोठ्या गावांवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विशेष लक्ष आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठ्या गावांतील व्होट बँक नेत्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे या निवडणुकीत सावळज, मांजर्डे, हातनूर, विसापूर, येळावी, कवठेएकंद या गावांवर सर्वच नेत्यांचा फोकस आहे. या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.निवडणूक गावांतील प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग : सावळज, विजयनगर, पेड, धामणी, गोटेवाडी, नागाव कवठे, कौलगे, धुळगाव, यमगरवाडी.सर्वसाधारण प्रवर्ग महिला : आळते, हातनूर, विसापूर, शिरगाव (वि.), निंंबळक, डोर्ली, वज्रचौंडे, तुरची, गौरगाव, वाघापूर, वडगाव, दहीवडी.नागरिकांचा मागास प्रवर्ग : सिध्देवाडी, पाडळी, येळावी, राजापूर, लोकरेवाडी, जुळेवाडी.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : नरसेवाडी, लोढे, मोराळे, कवठेएकंद, जरंडी, गव्हाण, धोंडेवाडी.अनुसूचित जाती : बोरगाव, मांजर्डे, डोंगरसोनी.अनुसूचित जाती महिला : हातनोली, ढवळी.
आबा-काका गटात होणार धुमशान
By admin | Updated: October 5, 2015 00:05 IST