सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी पंचायत समिती गटाचे सदस्य पतंगबापू यमगर व माजी सरपंच अण्णाप्पा माने यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते माजी मंत्री आर. आर. पाटील यांचे कट्टर समर्थक होते. या दोघांचा खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रवेशाने पुन्हा एकदा आबा गटाला धक्का बसला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आर. आर. आबांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक शिलेदारांनी भाजपशी सोयरिक केली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी आबा गटाला सुरूंग लावला आहे. यापूर्वी पंचायत समितीच्या सभापती वैशाली पाटील, माजी उपसभापती अनिल शिंदे, सुभाष चंदनशिवे, राष्ट्रवादी युवकचे हायूम सावनूरकर आदींनी संजयकाकांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात आता आणखी एका पंचायत समिती सदस्याचा समावेश झाला आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर रांजणी पंचायत समिती गटातून निवडून आलेले पतंगबापू यमगर यांच्यासह माजी सरपंच अण्णाप्पा माने यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सांगलीतील शासकीय विश्रामगृहात खा. संजयकाका पाटील यांनी या दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे उपस्थित होते. यमगर व माने यांनी राष्ट्रवादीत सक्षम नेतृत्व राहिलेले नाही. रांजणी परिसराच्या विकासासाठी आणि टेंभूचे पाणी या भागाला मिळावे, यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. संजयकाका पाटील म्हणाले की, रांजणीतील दोन्ही नेत्यांनी भाजपसोबत काम करावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. आज त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. रांजणी परिसराचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून, त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही, अशी ग्वाही दिली. (प्रतिनिधी)
आबा गटाचे पंचायत समिती सदस्य काकांकडे!
By admin | Updated: December 8, 2015 00:35 IST