शिराळा : कुत्र्यांच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेले साळिंदर वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील एका बंदिस्त नाल्यात अडकले. शुक्रवारी (दि. १८) रात्री १० वाजता सुरू झालेले हे थरारनाट्य पहाटे अडीच वाजता संपले. वनविभाग आणि प्राणिमित्रांनी साडेचार तास शर्थीचे प्रयत्न करत, ड्रिल मशीनने काँक्रिटचा नाला फोडून या मुक्या जीवाला जीवनदान दिले. या बचावकार्यात साळिंदराचे काटे लागल्याने दोघे जण जखमी झाले.याबाबत माहिती अशी, शुक्रवारी रात्री काही कुत्रे एका साळिंदराच्या शिकारीसाठी मागे लागले होते. जीव वाचवण्यासाठी हे साळिंदर सैरावैरा पळत सुटले आणि गावातील तीस फूट लांबीच्या बंदिस्त नाल्यात शिरले. मात्र, नाल्यात गाळ अधिक असल्याने आणि नाला अरुंद असल्याने ते आतमध्येच अडकून पडले. ही बाब लक्षात येताच प्राणिमित्र आणि वनविभागाला पाचारण केले.रात्री दहाच्या सुमारास बचावकार्याला सुरुवात झाली. नाला काँक्रिटचा आणि अरुंद असल्याने साळिंदराला बाहेर काढण्यात अडथळे येत होते. अखेर, रात्री उशिरा ड्रिल मशीन आणि घणाच्या साहाय्याने नाला फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. काळजीपूर्वक नाला फोडून, साळिंदराला कोणतीही इजा न होऊ देता बाहेर काढले. पहाटे अडीच वाजता या थरारक बचावकार्याला यश आले. या संपूर्ण मोहिमेत वनरक्षक दत्तात्रय शिंदे आणि प्राणिमित्र धीरज गायकवाड यांना साळिंदराचे काटे लागल्याने ते जखमी झाले. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स प्राणिमित्र धीरज गायकवाड, पंकज कदम, सुभाष पाटील, मारुती पाटील यांनी हे बचावकार्य यशस्वी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुखरूप बाहेर काढलेल्या या साळिंदराला नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
शिराळा व वाळवा तालुक्यांत वन्यप्राणी व वन्यजीव यांचा जास्त प्रादुर्भाव आहे. त्यांना रेस्क्यू करताना पकडण्यासाठी अत्याधुनिक साहित्य तसेच प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. हे साहित्य मिळाल्यास वन्यप्राणी व वन्यजीव यांचे चांगल्या पद्धतीने त्यांना जखम न होता सुखरूप सुटका करता येईल. - सुशीलकुमार गायकवाड, संस्थापक ,सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स.
Web Summary : A porcupine, fleeing dogs, got trapped in a drain in Sangli. After a 4.5-hour rescue, rescuers drilled through concrete, saving it. Two were injured by its quills. The porcupine was released back into its natural habitat.
Web Summary : सांगली में कुत्तों से भागते हुए एक साही नाले में फंस गया। 4.5 घंटे के बचाव के बाद, बचाव दल ने कंक्रीट में ड्रिल करके उसे बचाया। दो लोग उसके कांटों से घायल हो गए। साही को वापस उसके प्राकृतिक आवास में छोड़ दिया गया।