सिंचन योजना सुरू करण्यासाठी आलेल्या वीज बिलाच्या एकूण रकमेपैकी ८१ टक्के रक्कम कृष्णा खोरे महामंडळ भरणार आहे. तसेच उर्वरित १९ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी वसुलीतून भरण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून वसूल झालेल्या पाणीपट्टीच्या रकमेतून १९ टक्के वीज बिलाची रक्कम भरली आहे. पण, काही कृष्णा खोरे महामंडळाकडून भरण्यात येणारी ८१ टक्के रक्कम वेळेत भरली नसल्यामुळे थकीत वीज बिलाचा प्रश्न गंभीर बनला होता. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांचे १०८ कोटी ४९ लाखांचे वीज बिल थकीत होते. त्यापैकी २८ कोटी ८६ लाख व्याजाची रक्कम महावितरणकडून माफ होणार आहे. यामुळे सध्या तिन्ही योजनांकडे ७९ कोटी ६३ लाख रुपये महावितरणला भरायचे होते. त्यापैकी कृष्णा खोरे महामंडळाकडून ३९ कोटी १२ लाख आणि टंचाई निधीतून १५ कोटी ७४ लाख रुपये पाटबंधारे विभागाला मिळाले आहेत. ही रक्कम महावितरणला भरल्यानंतर तीन योजनांची केवळ २४ कोटी ७७ लाख रुपये थकबाकी शिल्लक राहणार आहे. सिंचन योजना सुरळीत चालण्यासाठी नियमित पाणीपट्टी वसूल होण्याची गरज आहे. तरच वीज बिलाच्या थकबाकीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. यासाठी पाणीपट्टी वसुलीसाठी कृष्णा खोरे महामंडळाने स्वतंत्र आणि पारदर्शक यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.
चौकट
सिंचन योजनांचे थकीत वीज बिल
योजना वीज बिलाची रक्कम कृष्णा खोरे टंचाई निधीतून
टेंभू ५०.९७ कोटी १८.४६ कोटी ५.४६ कोटी
ताकारी १७.८६ कोटी ५.१५ कोटी १.९१ कोटी
म्हैसाळ २९.६६ कोटी १५.५१ कोटी ८.३७ कोटी
एकूण १०८.४९ कोटी ३९.१२ कोटी १५.७४ कोटी