कोरोनामध्ये ग्रामीण जनतेला सर्वाधिक उत्तम दर्जाची आरोग्य सेवा प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच दिली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी मोठ्या रुग्णालयांनी आरोग्य सेवा थांबविली होती. अनेक रुग्णांना वेळेत उपचार झाले नसल्यामुळे त्यांचा बळी गेला आहे. कोरोनामध्ये शासकीय आरोग्य यंत्रणा कशी सक्षम असली पाहिजे, हे सिद्ध झाले आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकार शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरत नाही. मूलभूत सुविधांचा तेथे अभाव असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा देऊ शकत नाहीत. आटपाडी, जत तालुक्यात आरोग्य केंद्रामध्ये शिपायांचीही पदे रिक्त आहेत. यामुळे तेथील स्वच्छतेसह रुग्णांना सेवा देताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कंत्राटीपदावर आरोग्य सेवा सक्षम होणे खूप कठीण आहे, असे आरोग्य कर्मचारी संघटना आणि डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करायची असेल तर रिक्त पदे शंभर टक्के भरण्याची गरज आहे.
चौकट
आरोग्य विभागाकडील रिक्त पदे
विभाग मंजूर रिक्त पदे
औषधनिर्माता ६४ १६
प्रयोगशाळा तंत्रज्ञ २ १
कृष्ठरोग तंत्रज्ञ ४ ४
आरोग्य पर्यवेक्षक ८ ३
आरोग्य सेवक १२० २०
औषध फवारणीस १९० १६२
आरोग्य सेविका ५७९ २९३
वैद्यकीय अधिकारी १२८ ३
एकूण ११२७ ५०२
चौकट
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे : ६२
उपकेंद्रे : ३२०
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. शासन ती पदे भरणार आहे, पण तोपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवक व सेविकांची पदे भरली आहेत. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चांगली आरोग्य सेवा सुरू आहे.
- डॉ. मिलिंद पोरे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली