सांगली : मागील आठवड्यात कांद्याचे दर ४० ते ४५ रुपये किलोवर स्थिरावल्यामुळे सांगलीसह सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून बुधवारी विक्रमी ५० टन कांद्याची आवक येथील विष्णुअण्णा फळमार्केटमध्ये झाली. एकाचदिवशी ५० ट्रक कांदा आल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. कांदा ठेवण्यासाठी बाजार समितीकडे जागाच शिल्लक नव्हती. अखेर प्रशासनाने कांदा बाहेर उघड्यावर ठेवण्यासाठी प्लास्टिक कागद उपलब्ध करून दिले. आवक वाढल्याचे दर मात्र कोसळले आहेत.विष्णुअण्णा फळमार्केटमध्ये यापूर्वी पंधरा ते पंचवीस ट्रक कांद्याची आवक होत होती. परंतु, मागील महिन्याभरात कांद्याला विक्रमी दर मिळाला. ४० ते ४५ रुपये किलोवर दर स्थिरावल्यामुळे बुधवारी सकाळी सातारा, सोलापूर जिल्ह्यातून कांद्याचे पन्नासहून अधिक ट्रक आले. ट्रक लावण्यासाठीही जागा नव्हती. यामुळे बाजार समिती प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यातच इतर फळांची आणि भाजीपाल्याची वाहनेही आली होती. यामुळे आवारात दोन ते तीन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी झाल्याची आणि कांदा ठेवण्यासाठी जागा नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडे केली. सचिव प्रकाश पाटील यांनी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना तात्काळ विष्णुअण्णा मार्केटमध्ये पाठवून वाहतुकीची कोंडी कमी केली. शेतकऱ्यांचा सर्व कांदा ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था केली. गोदामे भरल्याने उर्वरित कांदा बाहेर ठेवण्यासाठी प्लास्टिक कागदही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आला. सांगलीत कांद्याची आवक वाढल्यामुळे दरही उतरले आहेत. मागील महिन्यात ४० ते ४५ रुपये दर होता. चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ दिवसांपासून रोज ५० टन कांद्याची आवक होत आहे. यामुळे कांद्याचे दर १५ ते ३५ रुपये किलोवर आले. बुधवारी तर चांगल्या कांद्यास केवळ १० ते २५ रुपये दर मिळाला. बाजारात पूर्वीचा कांदा शिल्लक असून, बुधवारी आणखी ५० ट्रकमधून दहा हजार पोत्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याचे दर आणखी उतरतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)गोदामे भरली : प्लास्टिक कागदाचा आधारसांगलीत चांगला दर मिळत असल्याने सातारा, सोलापूरसह सांगली जिल्ह्यातून शेतकरी कांदा घेऊन येत आहेत. गेल्या चार दिवसात कांद्याची विक्रमी आवक झाल्यामुळे बाजार समितीमधील गोदामे भरली आहेत. त्यामुळे प्लास्टिक कागद वापरून बाहेरच पोती ठेवण्यात आली आहेत. आवक वाढल्यामुळे दर मात्र प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये झाला आहे. हलक्या प्रतीच्या कांद्याचा दर प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये झाला आहे, असे बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी सांगितले.
दररोज ५0 टन कांदा...
By admin | Updated: October 8, 2015 00:38 IST