इस्लामपूर : शहरातील राजेबागेश्वर नगरमधील दगडी बंगला परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील दोन तोळे वजनाचे दागिने आणि मोबाईल अशा ४५ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केली. गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ या काळात ही धाडसी घरफोडी झाली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत लक्ष्मण दत्तू पाटील (४८) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते पत्नीसह बँकेतील कामासाठी सकाळी ११ वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडले होते. सर्व कामे आटोपून ते दुपारी दोनच्या सुमारास घरी आले. त्या वेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. कुलूप तुटून पडल्याचे दिसले. आत जाऊन पाहिल्यावर घरातील कपाटातील दोन सोन्याच्या चेन, मोबाईलची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दगडी बंगल्याचा परिसर दुपारच्या वेळेस निर्जन झालेला असतो. त्यामुळेच बंद घर हेरून चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली. सहायक पोलीस उपनिरीक्षक बळीराम घुले अधिक तपास करत आहेत.