वाळवा : कोरोना व महापूर काळात वाळवा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कामे केली. याची दखल घेत या कर्मचाऱ्यांना ४० टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी दिली.
वाळवा ग्रामपंचायत सभागृहात कोरोना व महापूर काळात उत्कृष्ट कामगिरी केलेले ग्रामपंचायतीचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी व आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायकवडी बोलत होते. डॉ. वैभव नायकवडी, डॉ. रणजित भोई, डॉ. प्रसाद दौंडे, डॉ. प्रशांत जाधव यांनी महापूर काळात केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. महावितरणचे कर्मचारी वैभव कुंभार व सर्व सहकारी वायरमन, ग्रामपंचायतीचे नळपाणी पुरवठा विभागातील कर्मचारी पांडुरंग सूर्यवंशी व प्रमोद यादव तसेच भारतीय हवाई दलात निवड झाल्याबद्दल ऋषिकेश डवंग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, आनंदराव शिंदे उपस्थित होते.