सांगली : लाॅकडाऊन काळातही जिल्ह्याच्या जीएसटीत वाढीचा आलेख कायम राहिला असून, मे महिन्याच्या एकूण जीएसटी महसुलात गतवर्षाच्या तुलनेत ३६ टक्के वाढ झाली आहे.
मागील आर्थिक वर्षात जून २०२० पासून सुरू झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड नोव्हेंबर २०२० चा अपवाद वगळता मे २०२१ पर्यंत कायम राहिला असून, सांगली जिल्ह्याच्या मे २०२१ च्या जीएसटी संकलनात मागील मे महिन्याच्या तुलनेने ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मागीलवर्षी या महिन्यात जीएसटीचे संकलन ३८ कोटी ४२ लाख रुपये होते. मे २०२१ चा महसूल ५२ कोटी ३७ लाख इतका झाला आहे. जीएसटी महसुलात सुमारे १४ कोटींची वाढ झाली आहे. मागीलवर्षी मे २०२० मध्ये पूर्ण लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय, सेवा ठप्प झाल्या होत्या. यावर्षीही लॉकडाऊन असतानाही मे महिन्यात महसुलात वाढ दिसत आहे. चालूवर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यांचा मिळून १३६.७० कोटी महसूल हा मागीलवर्षीच्या या कालावधितील महसुलाच्या ८७.२९ कोटीने म्हणजेच १७६ टक्के वाढ दर्शविणारा आहे.
देशाचा विचार करता, मे महिन्याच्या महसुलात ६५ टक्के जादा कर संकलन झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत जीएसटी महसुलात सातत्याने सुधारणा दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. व्याजात सवलत दिली आहे. प्रलंबित विवरणपत्रासाठीही अभय योजना आणली आहे. यामुळे प्रलंबित विवरणपत्रे भरल्यावर आगामी काळातील महसुलात वृद्धी होईल, अशी अपेक्षा व्यक्त कलेली जात आहे.
सांगलीचा विचार करता, या कालावधीत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होता, मात्र लॉकडाऊनचे निकष पाळून सांगली जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांकडून महसूल भरणा चांगला झाला आहे.