सांगली : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची दररोजची संख्या सरासरी २०० ते ३०० असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजन घेणाऱ्या रुग्णांची संख्या २०१ आहे, तर जिल्ह्यात ३२२ व्हेन्टिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हेन्टिलेटरचा तुटवडा तूर्त तरी नसल्याची दिलासादायी स्थिती आहे.
जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांत १२५ तर खासगी रुग्णालयांत १९७ व्हेन्टिलेटर्स आहेत. त्या तुलनेत गंभीर रुग्णसंख्या मात्र कमी आहे. शुक्रवारपर्यंतच्या अहवालानुसार १६० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. १४ रुग्ण नॉनइन्व्हेजिव्ह व्हेन्टिलेटरवर, तर २३ रुग्ण हायफ्लो नोझल ऑक्सिजनवर आहेत. इन्व्हेजिव्ह व्हेन्टिलेटरवरील रुग्णांची संख्या फक्त ४ आहे. त्यामुळे व्हेन्टिलेटरच्या बाबतीत गंभीर स्थिती जिल्ह्यात नाही. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक होता, त्यावेळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हेन्टिलेटर्स उपलब्ध झाले. शासनाकडून तसेच विविध सेवाभावी संस्थांकडून ७४ व्हेन्टिलेटर्स उपलब्ध झाले, त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. इस्लामपूर, कवठेमहांकाळ, शिराळा, मिरज कोविड रुग्णालय, सांगली शासकीय रुग्णालय, वॉन्लेस, विटा, जत ग्रामीण रुग्णालये यासह खासगी रुग्णालयांना व्हेन्टिलेटर्स देण्यात आले. अनेक खासगी रुग्णालयांनी स्वत:कडील व्हेन्टिलेटर्स क्षमतेत वाढ केली. त्याचाही फायदा रुग्णांना झाला. सद्य:स्थितीत मात्र ही सर्व व्हेन्टिलेटर्स वापराविना आहेत. मिरज कोविड रुग्णालयाव्यतिरिक्त अन्य सर्व शासकीय रुग्णालयांत व्हेन्टिलेटर्सची गरज भासलेली नाही. खासगी रुग्णालयांत ती अन्य गंभीर रुग्णांसाठी वापरात आहेत.
चौकट
व्हेन्टिलेटरची गरज तूर्त नाही
व्हेन्टिलेटरची गरज असणारे सर्व रुग्ण मिरज कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे अन्य शासकीय व खासगी रुग्णालयांतील व्हेन्टिलेटर तूर्त वापराविना आहेत. विशेषत: कवठेमहांकाळ, विटा, जत, शिराळा ग्रामीण रुग्णालयांत त्यांच्या वापराची आवश्यकता भासलेली नाही. सध्या १६० रुग्ण ऑक्सिजनवर असले तरी त्यांना व्हेन्टिलेटरची अतिरिक्त गरज भासलेली नाही. मात्र, सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता ते वापरात आणावे लागण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेने व्यक्त केली.
चौकट
व्हेन्टिलेटर्सचा तुटवडा तूर्त तरी नाही
१ मिरज कोविड रुग्णालयात ७५ व्हेन्टिलेटर्स आहेत, त्यातील १८ व्हेन्टिलेटर्सचाच सध्या वापर सुरू आहे. उर्वरित वापरण्याची गरज अद्याप भासलेली नाही.
२ जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच सांगली शासकीय रुग्णालयात मिळून ५० व्हेन्टिलेटर्स आहेत, त्यांचाही वापर कोरोना रुग्णांसाठी करावा लागलेला नाही. सांगली शासकीय रुग्णालयात अन्य रुग्णांसाठी ती वापरात आहेत.
३ जिल्ह्यात खासगी व शासकीय स्तरावर मिळून दररोज किमान तीन हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातच रुग्ण सापडत आहेत. परिणामी व्हेन्टिलेटर्सची गरज लागण्याइतपत गंभीर स्थिती निर्माण होण्यापूर्वीच रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत.
पॉइंटर्स
एकूण व्हेन्टिलेटर्स - ३२२
जिल्ह्यात उपचार सुरू असणारे रुग्ण - २३१४
कोविड रुग्णालयात दाखल गंभीर रुग्ण - २०१
कोविड रुग्णालयातील व्हेन्टिलेटर्स - ७५
कोट
सध्या जिल्ह्यात व्हेन्टिलेेटरचा व बेडचा तुटवडा अजिबात नाही. उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालयांतील व्हेन्टिलेटर वापरण्याची गरज तूर्त भासलेली नाही. मिरज कोविड रुग्णालयांत ७५ व्हेन्टिलेटर आहेत. सध्याची रुग्णसंख्या पाहता ती अतिरिक्त आहेत. त्यातील मोजक्याच व्हेन्टिलेटर्सचा वापर सुुरू आहे.
- डॉ. मिलिंद पोेरे, जिल्हा आरोग्याधिकारी