सांगली / पलूस : गेल्या सहा महिन्यांपासून पलूसमध्ये घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळीचा म्होरक्या अझरुद्दीन नदाफ याच्यासह आठजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नऊ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांतील ३२ तोळे सोन्याचे दागिने, तीन किलो चांदी असा एकूण नऊ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.अटक केलेल्यांमध्ये अझरुद्दीन जोहर नदाफ (वय १९), मोहसीन हासीम मुजावर (२७), सचिन गंगाराम नाईक (१९), अक्षय अनिल शिंदे (१९), जमीर ऊर्फ पप्या करीम शेख (१९, सर्व रा. रामानंदनगर, ता. पलूस), संतोष मोहन भंडारे (३०), संदीप शांताराम कांबळे (२४, टेंभू, ता. कऱ्हाड) व संदीप शांताराम कांबळे (३२, रेठरे कारखाना, ता. कऱ्हाड) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अझरुद्दीन नदाफ व अक्षय शिंदे पलूसमधील भारती पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षांत शिकतात. त्यांनी मोहसीन मुजावर, सचिन नाईक, जमीर शेख यांच्या मदतीने पलूसमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका रचली. हे पाचजण दिवसभर शहरात फिरून कोणते घर बंद आहे, याची टेहळणी करीत. त्यानंतर संधी मिळेल, तशी रात्री किंवा दिवसा घरफोडी करून दागिने लंपास करीत. लंपास केलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संदीप कांबळे याच्याकडे होती. संदीपने चोरीतील दागिने टेंभू येथील संतोष भंडारे व वैभव घाडगे यांच्या मदतीने कऱ्हाडच्या रविवार पेठेतील वर्धमान गोल्ड आणि श्रीनाथ ज्वेलर्स या दोन सराफी दुकानात विकले होते. टोळीच्या या कृत्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, कर्मचारी भगवान मोरे, नंदकुमार कदम, सुरेंद्र धुमाळे, सचिन चव्हाण, सुनील वडार, विनोद पाटील, ज्योतिराम पवार यांच्या पथकाने आठही संशयितांना एकाचवेळी ताब्यात घेतले. त्यांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केल्यानंतर एकापाठोपाठ एक अशा नऊ घरफोड्या उघडकीस आल्या. दागिने विकत घेणाऱ्या कऱ्हाडच्या दोन सराफांनाही ताब्यात घेतले. त्यांनी विकत घेतलेले ३२ तोळे दागिने व तीस किलो चांदी परत दिल्याने त्यांना साक्षीदार करण्यात आले आहे. दागिने परत देणार : सावंतजिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत म्हणाले की, टोळीतील सर्व संशयित पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहेत. म्होरक्या अझरुद्दीन नदाफ व अक्षय शिंदे या दोघांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. केवळ चैनीसाठी पैसा कमी पडू लागल्याने त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला. त्यांच्याकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येतील. नऊ घरफोड्यांचे गुन्हे नोंद आहेत. यातील सर्व फिर्यादींना न्यायालयाच्या परवानगीने लवकरात लवकर दागिने परत देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
३२ तोळे सोने, ३ किलो चांदी जप्त
By admin | Updated: November 16, 2014 00:07 IST