कृषी विभाग व महाबीजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार होते. बियाणे इंदूर ते सांगली वाहतुकीदरम्यान पावसात भिजल्याने उपलब्ध झाले नाही, असे कृषी विभाग व महाबीजच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यास मिळणारे ३०० क्विंटल सोयाबीन बियाणे वाहतुकीदरम्यान संपूर्ण कसे भिजले, वाहतुकीदरम्यान योग्य उपाययोजना का केली नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या बियाणांची परस्पर विक्री किंवा काळाबाजार करून शेतकरी व शासनाची फसवणूक होत आहे का? याचीही चाैकशी करावी. सध्या सोयाबीनला चांगला भाव असल्याने लागवडीसाठी सोयाबीन बियाणांची मागणी वाढली आहे. महाबीजचे ३० किलो बियाणे २००० ते २२०० रुपयांना मिळतात. खासगी कंपनीच्या तीस किलो बियाणांची किंमत ३००० ते ३५०० रुपये आहे. त्यामुळे संबंधित पुरवठादाराने काळ्याबाजारात बियाणे विक्री केल्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लागवडीचे नियोजन कोलमडून एकरी हजार ते बाराशे रुपये अधिकचा खर्च करावा लागणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रोहित चिवटे, रविकांत साळुंखे, शहराध्यक्ष रमेश मेंढे, अनिल हारगे, शंकर इसापुरे, महावीर किनिंगे, महावीर कर्वे, किशोर चंदुरे, अनुप पेटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
वाहतुकीदरम्यान ३०० क्विंटल सोयाबीन बियाणे भिजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST