मिरज : मिरजेतील भारतनगर परिसरात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने सुमारे २५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने उलट्या व जुलाबाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतनगर, हडको कॉलनी, ईदगाहनगर, उस्मानिया मोहल्ला परिसरात गेले चार दिवस नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. या परिसरात ड्रेनेजसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकाम करताना जलवाहिन्यांना मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे. मात्र जलवाहिन्यांची दुरूस्ती न करताच ड्रेनेज वाहिन्यांचे काम आटोपण्यात आल्याने, मोठ्याप्रमाणात सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. परिसरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार स्थानिक नागरिक इलियास शेख यांनी केली. गेले चार दिवस उलट्या व जुलाबाची लक्षणे असलेल्या सुमारे २५ रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आठ ते दहाजणांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रूग्णांमध्ये बालके, महिला व वृध्दांचा समावेश आहे. दूषित पाण्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी असलेल्या रूग्णांवर दररोज उपचार सुरू असल्याचे स्थानिक डॉक्टर इम्तियाज मुल्ला यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, महापालिका प्रशासनाने व आरोग्य विभागाने याबाबत दखल घेतली नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. (वार्ताहर)अनेकांना उलट्या व जुलाबशहरातील गुरुवार पेठ, सरवर मोहल्ला, पीर नालसाब चौक परिसरातही दूषित पाण्यामुळे उलट्या व जुलाबाची अनेकांना लागण झाली आहे. येथील रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दूषित पाणी पुरवठ्याची आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
२५ जणांना गॅस्ट्रोसदृश लागण
By admin | Updated: November 9, 2014 23:41 IST