सांगली : दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नवीन वीज जोडण्या ठप्प होत्या. शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी आवाज उठविल्यामुळे जिल्ह्यासाठी ६२ हजार ३४३ नवीन वीज मीटर उपलब्ध झाल्यामुळे २३ हजार २८५ वीज जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.
मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरचा लॉकडाऊन तसेच इतर कारणांमुळे वीज मीटर उपलब्धता कमी होत गेली. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग मंदावला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटना, सामाजिक संघटनांनी प्रलंबित वीज जोडणीच्या प्रश्नावर आवाज उठविला होता. याची गंभीर दखल राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन वीज मीटर उपलब्ध करण्यासह नवीन वीज जोडण्या तातडीने देण्याची सूचना दिली होती. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनीही गेल्या पाच महिन्यांत वीज मीटर उपलब्ध करण्यासाठी खासगी कंपन्यांशी पाठपुरावा केला. यामुळेच सिंगल फेजचे १८ लाख, तर थ्री फेजचे एक लाख ७० हजार नवीन वीज मीटर उपलब्ध करून दिले. यातूनच सांगली जिल्ह्यास सिंगल फेजचे ६० हजार १९२, तर थ्री फेजचे दोन हजार १५१ वीज मीटर उपलब्ध करून दिले. यामुळेच गेल्या वर्षभरात घरगुती १३२५७, वाणिज्य २४१३, औद्योगिक ४७८, कृषी ६४८३, पाणीपुरवठा ३३, पथदिवे ४१, इतर ५८० अशा २३ हजार २८५ नवीन वीज जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.
चौकट
सांगली जिल्हा वीज जोडणी घरगुती १३२५७
वाणिज्य २४१३
औद्योगिक ४७८
कृषी ६४८३
पाणीपुरवठा ३३
पथदिवे ४१
इतर ५८०
एकूण २३२८५
कोट
प्रलंबित वीज जोडण्यासाठी शासनाकडून वीज मीटरसह अन्य साहित्याचा पुरेसा पुरवठा होत आहे. यामुळे येत्या दोन महिन्यांत शंभर टक्के प्रलंबित वीज जोडण्या पूर्ण होणार आहेत. एकाही वीज ग्राहकाची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष देणार आहे.
-धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, सांगली विभाग, महावितरण.