कुपवाड : शहरातील मधुकर राजाराम शेडबाळकर (रा. ब्रह्मानंद काॅलनी कापसे प्लाॅट, कुपवाड) यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी काढून चोरट्याने घरातील सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रेसलेट, असा २३ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबतची तक्रार कुपवाड एमआयडीसी पोलिसांत दाखल झाली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मधुकर शेडबाळकर हे रिक्षा चालक आहेत. ते रिक्षा घेऊन गेले होते. पत्नी कामावर गेली होती. लहान मुलगा घराच्या दरवाजाला कडी लावून खेळायला गेला होता. चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला. घरातील फ्रीजवर ठेवलेली सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रेसलेट, असा २३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत शेडबाळकर यांनी कुपवाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.