मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी डाॅ. महेश जाधव, त्याचा भाऊ मेंदू शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. मदन जाधव यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूसह रुग्णालय कर्मचारी व तीन रुग्णवाहिकाचालक अशा १३ जणांना अटक केली आहे. डाॅ. महेश जाधव यास मदत करणाऱ्या सांगलीतील एका डॉक्टरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सत्र न्यायालयातील सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आज मंगळवारी यावर निर्णय होणार आहे. डाॅ. जाधव याच्या आर्थिक व्यवहारांची चाैकशी सुरू असून, अॅपेक्स कोविड रुग्णालय सुरू केल्यानंतर डाॅ. जाधव याने रुग्णालयात औषध विक्री दुकान चालविण्यास परवाना देण्यासाठी एकाकडून २० लाख रुपये घेतले. मात्र अॅपेक्समध्ये औषध विक्री दुकानासाठी परवाना नसतानाही डाॅ. जाधव याने संबंधित औषध विक्रेत्यास त्याच्या सांगलीतील औषध दुकानाच्या नावावर विनापरवाना औषध विक्री करण्यास भाग पाडल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत स्पष्ट झाले. अॅपेक्स रुग्णालयातून साडेचार लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डाॅ. जाधव यास २० लाख रुपये देऊन त्याच्यासोबत विनापरवाना औषध विक्रीत सहभागी झालेल्या संबंधितांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डाॅ. जाधव यास मदत करणाऱ्या आणखी काही जणांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
विनापरवाना औषध विक्री दुकानासाठी २० लाख उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST