लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका सांगली शहराला बसला आहे. ६० टक्के शहर पाण्याखाली होते. या महापुरामुळे महापालिकेच्या इमारती, रस्त्यांचे १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. २०१९च्या महापुरातही महापालिकेचे २०८ कोटींचे नुकसान झाले होते.
गेल्या दोन वर्षात सांगलीकर सातत्याने संकटांशी सामना करत आहेत. ऑगस्ट २०१९मध्ये आलेल्या प्रलयंकारी महापुराने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२०पासून कोरोनाशी लढा सुरू आहे. गेले वर्षभर महापालिकेची यंत्रणा कोरोनाशी संघर्ष करत असताना यंदा महापुराने संकटात नवी भर टाकली. त्यात महापालिकेची आर्थिक घडी आधीच विस्कटलेली आहे. दरवर्षी ७५० कोटींचा अर्थसंकल्प केला जात असला तरी प्रत्यक्षात महापालिकेचे उत्पन्न २५० कोटींच्या घरातच आहे. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना प्रशासनाला कसरत करावी लागते. त्यात यंदाच्या महापुराने महापालिकेला मोठा झटका दिला आहे.
कृष्णेच्या महापुराचा सर्वाधिक फटका सांगलीला बसतो. यंदा ५५ फुटांपर्यंत पाणीपातळी गेली होती. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह ६० टक्के नागरी वस्ती पुराने बाधित झाली होती. दीड लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यांच्या निवारा, जेवणाची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती. त्यातच आता महापालिकेच्या इमारती, रस्त्यांनाही महापुराचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगली-मिरजेतील जवळपास ५० ते ५५ किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. पुराचे पाणी या रस्त्यांवर थांबल्याने वाहतूक सुरळीत होताच त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय महापालिका इमारतींना पुराचा फटका बसला आहे. महापालिकेचे मुख्यालय दोन ते तीन दिवस पाण्याखाली होते. गावभाग, जामवाडी परिसरातील आरोग्य केंद्र, शाळा, आमराई, प्रतापसिंह, शाहू, शास्त्री उद्यान, पाणी पुरवठा विभागाकडील जॅकवेल, पपिंग स्टेशन, मलनि:स्सारणाची यंत्रणा, विद्युत खांब व साहित्य अशा विविध बाबींचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेचे १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, तसा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे.
चौकट
यंदा तरी मदत मिळणार का?
२०१९च्या महापुरात महापालिकेच्या इमारती, रस्ते, पाणी पुरवठा, विद्युत, ड्रेनेज विभागाचे २०८ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी मदतीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. पण दोन वर्षात एक रुपयांची भरपाई मिळालेली नाही. आताही १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दोन वर्षात महापालिकेचे जवळपास ३९३ कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तरी शासनाकडून महापालिकेला मदतीचा हात दिला जाणार की प्रस्ताव पुन्हा धूळखात पडणार, याची चिंता प्रशासनाला लागली आहे.