सांगली : माधवनगर ( ता. मिरज) येथे मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सागर ज्वेलर्समधून १५ तोळ्याचे सोने आणि चांदीचे दागिन्यांची बॅग लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुंखे (रा. घनश्याम नगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवनगरमध्ये दत्ताजी साळुंखे यांचे सागर ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे साळुंखे यांनी सराफी दुकान उघडले. त्यांनी घरातून १५ तोळ्याच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांची बॅग दुकानातील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली. ते दुकानात साफसफाई करत होते. याचवेळी दोन तरुण मोटारसायकलीवरुन त्यांच्या दुकानात आले. चोरट्यांनी त्यांना तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले आहेत, असे सांगितले. त्यामुळे साळुंखे ते पडलेले पैसे घेण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले. तितक्यात दोघा चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश करुन आतील बाजूस ठेवलेली सोने आणि चांदीच्या दागिन्याची पिशवी घेतली आणि मोटारसायकलीवरून पळून गेले. ते तरुण पळून का गेले, हे साळुंखे पहात असताना त्यांना त्यांच्या दागिन्याची पिशवी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ संजयनगर पोलिसांना माहिती दिली. संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
चौकट
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
सराफी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये चोरट्यांनी पैसे पडल्याबाबत केलेल्या बहाण्यापासून सोने-चांदीचे बॅग नेईपर्यंतचा सारा घटनाक्रम कैद झाला आहे. चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथकेही रवाना झाली आहेत.