विटा : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने पुकारलेल्या वीकेंड लॉकडाऊनचा विटा आगाराला मोठा फटका बसला असून, दोन दिवसांत १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. दरम्यान, रविवारी दुसऱ्या दिवशीही वीकेंड लॉकडाऊनला विटा शहरासह खानापूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
संपूर्ण व्यवहार बंद ठेवून व्यापारी व नागरिकांनी वीकेंड लॉकडाऊन यशस्वी केला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्याला सांगली जिल्हा, पर्यायाने खानापूर तालुकाही अपवाद नाही. विटा शहरासह खानापूर तालुक्यातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सुमारे २५० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे तालुक्यात लॉकडाऊन व कडक निर्बंधांची गरज निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने शनिवार व रविवार या दोन दिवशी जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळाची संपूर्ण बससेवा ठप्प झाली आहे. विटा आगारात असलेल्या ५८ बसेस रविवारी दुसऱ्या दिवशीही आगारात ‘लॉकडाऊन’ करण्यात आल्या होत्या.
विटा आगारातून ग्रामीण भागात दररोज ३४० बसफेऱ्या आहेत; तर नाशिक, मुंबई, बोरिवली व नांदेड या लांब पल्ल्याच्या पाच, तर सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड या मध्यम पल्ल्याच्या ९ अशा ३५४ बसफेऱ्या पूर्णपणे ठप्प झाल्याने वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांत सुमारे १२ लाख रुपयांचा फटका विटा आगाराला बसला आहे.
वीकेंड लॉकडाऊनच्या रविवारी दुसऱ्या दिवशीही विटा आगारातील सर्व ५८ बसेस आगारात थांबल्या होत्या; तर बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांअभावी शुकशुकाट दिसून येत होता. विटा आगारात चालक व वाहकांची संख्या २८० व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास १०० च्या आसपास आहे. त्यामुळे हे सर्व कर्मचारीही गेल्या दोन दिवसांपासून घरीच बसून आहेत.
दरम्यान, विटा शहरासह खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी दुसऱ्या दिवशीही वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. विट्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ पूर्णपणे बंद होती; तर नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केल्याने शहरातील प्रमुख रस्ते ओस पडल्याचे चित्र रविवारी पाहावयास मिळाले.
फोटो : ११०४२०२१-विटा-एस.टी. स्टॅण्ड ०१
ओळ : विटा शहरात वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी विटा बसस्थानकात रविवारी प्रवाशांअभावी असा शुकशुकाट होता.
फोटो : ११०४२०२१-विटा-एस. टी. स्टॅण्ड ०२
ओळ : विटा आगारात वीकेंड लॉकडाऊनमुळे गेल्या दोन दिवसांपासून सर्व बसेस अशा एकाच जागी लॉकडाऊन झाल्या आहेत.