सांगली : जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखांमध्ये ४३ हजार ७४० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची क्षमता आहे. त्यापैकी ३७ हजार ६६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. कला, वाणिज्य आणि संयुक्त शाखांच्या दहा हजार ५३७ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. विज्ञान शाखेमध्ये प्रवेशक्षमतेपेक्षा तीन हजार ४३७ प्रवेश जादा झाले आहेत. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा न घेताच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. यामुळे अकरावी प्रवेश कसे होणार, याबाबत चर्चा रंगली होती. अखेर दहावीच्या गुणांवरच अकरावी प्रवेश करण्याच निश्चित झाले. जिल्ह्यात कला शाखेची प्रवेशक्षमता १६ हजार ६०० असून, त्यापैकी केवळ आठ हजार ६७४ प्रवेश झाले आहेत. उर्वरित सात हजार ९२६ जागा रिक्त राहिल्या आहेत. वाणिज्य शाखेच्या सात हजार २६० जागा असून, पाच हजार ६७२ प्रवेश झाले. उर्वरित एक हजार ५८८ जागा रिक्त राहिल्या. कला आणि वाणिज्य संयुक्त प्रवेश घेण्यासाठी दोन हजार ५०० जागा असून, त्यापैकी एक हजार ४७७ प्रवेश झाले आहेत. एक हजार २३ जागा रिक्त राहिल्या आहेत. विज्ञान शाखेच्या १७ हजार ३८० जागा असून, २० हजार ८१७ प्रवेश झाले आहेत. क्षमतेपेक्षा तीन हजार ४३७ प्रवेश जादा झाले आहेत. याबाबत माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. ते म्हणाले की, विज्ञान शाखेत क्षमतेपेक्षा जादा प्रवेश झाले असले तरी अनेक मुले अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेत आहेत. यामुळे क्षमतेएवढेच प्रवेश होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट
अकरावी प्रवेशाचा लेखाजोखा
विभाग प्रवेशक्षमता झालेले प्रवेश रिक्त जागा
कला १६६०० ८६७४ ७९२६
विज्ञान १७३८० २०८१७ ३४३७ जादा प्रवेश
वाणिज्य ७२६० ५६७२ १५८८
संयुक्त २५०० १४७७ १०२३
एकूण ४३७४० ३७६६३ १०५३७