सांगली : जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली. या निधीतून लवकरच कामाचे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातील, असेही ते म्हणाले.
सूर्यवंशी म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ८ कोटी ८६ लाख, तर नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा योजनेंतर्गत १ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, तसेच महिनाभरापूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत ११ कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळाली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग व लाॅकडाऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शहरातील विकासकामांवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनकडून निधीची मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे. लवकरच विकासकामांचे प्रस्ताव तयार करून ते जिल्हा प्रशासनाकडे पाठविले जातील. या निधीमुळे शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागतील. या कामासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक शेखर माने यांनी पाठपुरावा केला होता, असे त्यांनी सांगितले.