आष्टा : येथील बहुचर्चित पंचशील नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक, कर्मचारी व कर्जदारांनी संगनमत करून १ कोटी ३ लाख ४३ हजारांचा अपहार केल्याचे आज (शनिवारी) उघड झाले. त्यांच्याविरुद्ध आष्टा पोलिसांत लेखापरीक्षक ज्ञानदेव कृष्णा हसबे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने आष्टा परिसरातील सहकारी संस्थांमध्ये खळबळ माजली आहे. येथील गणपती मंदिरासमोर पंचशील पतसंस्थेची टोलेजंग इमारत आहे. १९९९ ते २००० ते २०१२-१३ या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये तत्कालीन संचालक वसंत आवटी, बापूसाहेब चौगुले, सुरेश आवटी, जयपाल मगदूम, कृष्णराव थोरात, कुलभूषण आवटी, प्रकाश शिंदे, अनंत कासार, संपत ढोले, सौ. सुचिता हालुंडे, भालचंद्र सावळवाडे, जिनपाल इंगळे, तातोबा आवटी, गुणेंद्र शेटे, बाळासाहेब चौगुले, सुभाष लिगाडे, सौ. चंचला लिगाडे हे संचालक व कर्मचारी गुणधर मगदूम (सचिव), रवींद्र शेटे, सुरेश कुरुंदवाडे, सुनीता वग्याणी, संगीता हालुंडे, संजय इंगळे, मुरलीधर शिंदे, दर्शन पेटारे, नेमिनाथ वठारे, संदीप घसघसे, बाळासाहेब चौगुले, अशोक वाडकर, सौ. अनुराधा थोरात, पृथ्वीराज थोरात, ऋतुराज थोरात, संयुक्ता थोरात, श्रीमती जयश्रीबाई थोरात, मंगलादेवी गायकवाड, सुजित आवटी, सोनाबाई मगदूम, अशोक मगदूम, धनपाल मगदूम, स्वाती आवटी, सुमन हनमाने, शांताबाई कावरे, मन्सूर मुजावर, मुबारक लतीफ, कल्लाप्पा आवटी, पुष्पावती आवटी, रघुनाथ मादळे, मंगला मादळे, सुनील चौगुले, संदीप आवटी, शामराव इंगळे, अनिलकुमार चौगुले प्रकाश गावडे, दीपक मगदूम, उज्ज्वला पाटील, राजाराम कटारे, भूपाल दरूरे, वसंत रेवाण्णा, रावसाहेब घाणवटे, पुष्पा नायर, भीमसेन कोळी, मोहन शिंदे, राकेश राजवत, मंगल साळे, प्रवीण लोकापुरे, शंकर शिंदे, मायव्वा पालखे, आण्णाप्पा सन्नोळी, तुकाराम हांडे, भरतेश बोरगावे (सर्व रा. आष्टा व कुपवाड) यांनी कर्ज घेतले आहे. सर्व संचालकांनी महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० व संस्थेच्या उपनिधीतून तरतुदीचे पालन न करता बेकायदेशीररित्या स्वत:साठी, नातेवाईकांसाठी व हितसंबंधितांसाठी निर्विवाद तारण न घेता कर्जे दिली आहेत. संचालक, कर्मचारी व कर्जदार यांनी संगनमत करून पतसंस्थेच्या ठेवीदारांनी संस्थेत ठेवलेल्या ठेवींचा स्वत:च्या फायद्याकरिता कर्जरूपाने वापर करून घेऊन गैरव्यवहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केल्याचा ठपका आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या गैरव्यवहाराबाबत ज्ञानदेव हसबे यांची लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी या कालावधितील लेखापरीक्षण करून उपनिबंधकांना अहवाल सादर केला होता. यामध्ये संचालक, कर्मचारी, कर्जदार यांनी आष्टा येथील मुख्य शाखा व कुपवाड (सांगली) शाखेत १ कोटी ३ लाख ४३ हजारांचा अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने या सर्व संचालक, कर्मचारी व कर्जदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
आष्ट्यातील पतसंस्थेत एक कोटीचा अपहार
By admin | Updated: March 1, 2015 00:12 IST