रत्नागिरी : कॅशबॅक रिवॉर्डचे आमिष दाखवून एका तरुणीला सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार शनिवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याचा कालावधीत रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथे घडला. याप्रकरणी नितीनकुमार सिंग नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदिनी लहू निंबरे (२२, रा. वेतोशी खालचीवाडी, रत्नागिरी ) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी त्यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला. नितीनकुमार सिंग नावाच्या या व्यक्तीने आपण फोन पे कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. ५ हजार रुपयांचे कॅशबॅक रिवॉर्ड लागले असून त्यासाठी एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास त्याने सांगितले. त्यानंतर ॲप्लिकेशन कोड आणि एटीएम पिन घेऊन त्याने निंबरे यांच्या खात्यातील १ लाख ३३ हजार ९५१ रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, निंबरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप करत आहेत.