दापोली : दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात सुयाेग जाधव (२७, रा. कर्दे, दापाेली) याचा मृत्यू झाला, तर अन्य दाेघे जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोंडे फणसू फाटा येथे घडला.
या अपघातात फणसू येथील संतोष सुर्वे (५५) व शुभम सुर्वे (२३, दाेघे रा. कोंडे) हे गंभीर जखमी झाले आहेत. सुयोग जाधव दुचाकी घेऊन कोंडे या गावी गेला हाेता. फणसू फाट्याजवळ आला असता सुयोगचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये सुयोगच्या नाकाला, डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. गाडीवर बसलेल्या शुभम सुर्वे याच्या डोक्याला व पायाला, तर संतोष सुर्वे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ दापाेलीतील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुयोगला तपासून मयत घोषित केले अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.