खेड : तालुक्यातील भरणे येथे बेकायदेशीररित्या कोविड केअर सेंटर चालविणाऱ्या डाॅक्टरवर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना आमदार योगेश कदम यांनी शुक्रवारी खेड पंचायत समिती सभापती निवास येथे बोलावलेल्या आढावा बैठकीत चांगलेच फैलावर घेतले.
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून खेड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली होती. तर केवळ नगर परिषद कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे केवळ ६० ते ६५ रुग्णांवर उपचाराची सोय उपलब्ध होती. गतवर्षी लोटे येथे हॉटेलमध्ये कोविड सेंटर सुरू करणाऱ्या त्यांनी दि. ८ एप्रिल रोजी भरणे येथे एसएमएस हॉस्पिटलमध्ये कोणतीही परवानगी न घेता कोविड संशयित रुग्णांना दाखल करून घेण्यास सुरुवात केली. या रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके व प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना माहिती दिल्यानंतर या रुग्णालयाची पाहणी करून याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांची खात्री त्यांनी केली. या पाहणीनंतर डॉ. शेळके यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अहवाल सादर केला. संबंधित रुग्णालय चालवणाऱ्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार योगेश कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
मात्र, तब्बल दहा दिवस उलटूनही आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. आमदार योगेश कदम यांनी शुक्रवार दि. २३ रोजी सभापती निवासाच्या सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेतला.
या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांची आमदार कदम यांनी चांगलीच हजेरी घेतली. याप्रकरणी डॉ. शेळके यांना आमदार कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता आली नाहीत. केवळ वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर केल्याचा खुलासा डॉ. शेळके यांनी केला. यावेळी तत्काळ कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असे आमदार कदम यांनी सांगितले.
या बैठकीत शिवतेज आरोग्य सेवा संस्थेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरसाठी डॉक्टर व परिचारिका यांची व औषधांची उपलब्धता करून घेण्याचे आदेश आमदार कदम यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, डॉ. चेतन कदम, अजित तटकरे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांसह पदाधिकारी उपस्थित होते.