पाचल : राजापूर तालुक्यातील येरडव गावच्या जलस्वराज्य प्रकल्पाचे तीनतेरा वाजले आहेत. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून हा जलस्वराज्य प्रकल्प कागदोपत्री पूर्ण आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. तालुक्यातील प्रथम प्रकल्प म्हणून याची नोंद आहे. यावर शासनाने १८ लाख खर्च करुन आपले धोरण बजावले असतानासुद्धा येथील ग्रामस्थांनी १० टक्के लोकवाटा वर्गणी काढली. तरीही पाणी का नाही? असा ग्रामस्थ सवाल करत असताना जलस्वराज्यच्या समितीने आपल्या अनुषंगाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे पाणी आपल्याला आता मिळणार नाही, याची खात्री या ग्रामस्थांना पटली आहे. अनेकवेळा या विषयांवर चर्चा होऊनही परिस्थिती जैसे थे आहे.येरडव - मुंबई मंडळाने दिलेल्या सहकार्याची न मिळालेली पोचपावती, समितीतल्या सदस्यांचा गैरसमज, ठेकेदाराने केलेल्या कामाचे मुल्यांकन न केल्यामुळे, गंजलेले पाईप, बंद पडलेला विद्युत पंप, महावितरण कंपनीने कापलेली वीजजोडणी यामुळे हा प्रकल्पाचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध होत नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. यावर बऱ्याचवेळा तोडगा काढण्यात आला. पण अंमलबजावणी कोण करतोय? शासनाचा १८ लाख रुपयांचा निधी खर्च होऊन त्यावर ग्रामस्थांनी दिलेल्या १० टक्के वर्गणीनेही पाणी मिळत नसेल तर या जलस्वराज्य समितीचा आम्हाला काय उपयोग? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. याविषयी सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात काही योजनांबाबत अनेकवेळा चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मात्र या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. येरडव येथील योजनेच्या कामात अनेक व्यवहार संशयास्पद स्थितीत असून जलस्वराज्य योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा हा हेतू डोळ््यासमोर ठेवून ही योजना पूर्ण व्हावी अशी मागणी केली होती. मात्र या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. (वार्ताहर)
येरडव जलस्वराज्य योजनेचे वाजले तीनतेरा
By admin | Updated: September 16, 2014 23:22 IST