लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वास संस्काराचे बाळकडू पाजण्यापेक्षा आघाडीचा धर्म पाळीत कोविड काळात तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांकरिता काम करण्याची आवश्यकता आहे. चुकीची माहिती देऊन जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्या आमदार याेगेश कदम यांनी माफी मागावी, असे परखड मत मंडणगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मांडले.
शहरातील कार्यालयातील तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, ज्येष्ठ नेते भाई पोस्टुरे, शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, राकेश साळुंखे यांनी पत्रकार परिषदेचे आयाेजन केले हाेते़ यावेळी ते म्हणाले की, आमदार योगेश कदम यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानिमित्त कुंबळे येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आराेप केले हाेते. या आरोपांचे खंडन करत आमदारांनी न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचे कार्यपद्धती व जनतेची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल जाहीर माफीची मागणी केली.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष मुझ्झफऱ मुकदाम म्हणाले की, राष्ट्रवादीने आघाडीच्या सत्ताकारणात नेहमीच मित्र पक्षांचा सन्मान करत ‘प्रोटोकॉल’ पाळला आहे. मित्रपक्षांकडून तीच अपेक्षा असून, विनाकारण आरोप करण्यापेक्षा आमदारांनी आपली ताकद जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्च करावी, असे सांगितले.
पंचायत समिती सदस्य नितीन म्हामूणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकहिताच्या प्रश्नांवर काम करीत असताना कोणतेही राजकारण करीत नसल्याचे सांगताना तालुक्यास कोणाच्या पाठपुराव्यामुळे रुग्णवाहिका मिळालेली आहे, याचे लेखी पुरावे देण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या धोरणात्मक निर्णयाचे श्रेय मिळवण्याचे प्रयत्न करू नयेत, या प्रयत्नात आपल्या पदाची प्रतिष्ठा टिकवण्यात त्यांना अपयश आले असून चुकीची माहिती दिल्याबद्दल निषेध करीत असल्याचे सांगितले.
प्रकाश शिगवण म्हणाले की, विद्यमान आमदार अद्याप युवासेना कोअर कमिटी सदस्य म्हणून वावरत आहेत. त्यांनी आमदार झाल्याचे भान ठेवून आघाडीतील मित्रपक्षांचा सन्मान राखावा. शहर अध्यक्ष वैभव कोकाटे म्हणाले की, आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून न केलेल्या कामांचे व यंत्रणेने केलेल्या कामांचे श्रेय मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण केलेली कामे लोकांसमोर सादर करावीत, असे सांगितले. आबोसी सेलचे राकेश साळुंखे यांनी आमदार आरोग्य मंत्र्यापेक्षा मोठे आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला.
---------------
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, वैभव कोकाटे, प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे उपस्थित हाेते.