लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध शेकडो शासकीय योजना गावांसाठी राबवता येतात. योजना राबविण्यासाठी खूप मेहनत तर घ्यावी लागेल. गाव कधी मरत नाही. सरपंच पदाची पाच वर्षे नेत्रदीपक कामगिरीची ठरावीत. सरपंचाचे विधायक कार्य ग्रामस्थांच्या नियमित स्मरणात राहील असे असावे. अडचणी आल्या तरी त्यावर मात करून सरपंचांनी वाटचाल करावी, असे आवाहन प्रभारी सभापती पांडुरंग माळी यांनी सरपंच बैठकीत केले.
येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात नुकत्याच ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. नवनिर्वाचित सरपंचांना ग्रामपंचायत कामकाजाविषयी माहिती मिळावी, ग्रामपंचायत कायद्याचे धडे मिळावेत, या हेतूने पंचायत समितीचे सभापती पांडुरंग माळी यांनी पुढाकार घेत सरपंच बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विस्तार सहायक गटविकास अधिकारी अरुण जाधव, अधिकारी भास्कर कांबळे, डी. वाय. कांबळे, कुरये, कक्ष अधिकारी चौरे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना ग्रामपंचायत कामकाजाचे धडे दिले.
प्रभारी सभापती माळी म्हणाले की, सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख आहे. गावात जास्तीत जास्त योजना राबविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यायला हवा. ग्रामस्थांच्या काही तक्रारी असतील तर त्या ग्रामपंचायत स्तरावरच मिटायला हव्यात. गावासाठी जितके काम करू तेवढे थोडेच आहे. सरपंच पदासाठी जितका कालावधी मिळाला आहे, त्या कालावधित लोकांच्या स्मरणात राहील असे काम प्रत्येकाने करावे.
यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या जबाबदाऱ्या, कामकाजात येणाऱ्या अडचणी, विविध योजनांचे प्रस्ताव कसे करावेत, जलजीवन मिशन, १५ वा वित्त आयोग, रोजगार हमीची कामे, समाजकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, पाणी पुरवठा आदीसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली.