खेड : कोरोना काळात नागरिक प्रकाशात राहावे, घरी सुरक्षित राहावेत म्हणून वीज मंडळाचे वायरमन, कर्मचारी, अधिकारीही दिवस-रात्र सेवा देण्यात गुंतले होते. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आमदार योगेश कदम यांनी काढले. खेड येथे दापोली मतदार संघातील वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार आमदार कदम यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार कदम म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये आपल्या सुरक्षिततेसाठी, आपल्याला चांगले जीवन जगता यावे म्हणून वैद्यकीय सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व पोलीस अविरत कार्यरत होते. त्याचप्रमाणे वीज कर्मचारीही कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांनी निसर्ग चक्रीवादळ, ताैक्ते वादळ व आता झालेल्या अतिवृष्टीतही कुठेही न थांबता दऱ्या-खोऱ्यातून, काटा-कुंट्यातून व जंगलातून आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले. या कर्मचाऱ्यांना अनेकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते, तुम्ही करत असलेल्या मेहनतीकडे त्यामुळे दुर्लक्ष होते. परंतु, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांचा हेवा करावासा वाटतो. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत अवघड जंगलातून वीजखांब उभे करणे, ट्रान्सफार्मर उभे करणे व लोकांना वीज पुरवठा करणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. पण ही सर्व कामे आपण हसतमुखाने करता, असे गौरवोद्गार आमदार कदम यांनी काढले. कार्यकारी अभियंता शिवतारे यांच्या कामाचेही आमदार कदम यांनी काैतुक केले.
या कार्यक्रमात आमदार योगेश कदम यांच्यातर्फे तीनही तालुक्यांतील वायरमन, कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरुण कदम, विजय कदम, तालुकाप्रमुख विजय जाधव, सभापती मानसी जगदाळे उपस्थित होते.