रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेच्या पर्समधील सुमारे १० हजार ६० रुपये लांबविल्याच्या संशयातून महिलेला शहर पोलिसांनी अटक केली. सोमवारी तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. ही घटना ८ मार्च रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती.
कलावती चंद्रकांत जाधव (वय ५९, रा.खालची आळी, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात नमिता वसंत घुडे (वय ४५, रा.घुडेवठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, दि. ८ मार्च रोजी त्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रॉपर्टी कार्डचे अर्ज लिहून घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मागे कलावती जाधव उभ्या होत्या. काही वेळाने नमिता घुडे यांनी आपल्या खांद्याला लावलेली पर्स उघडली असता, त्यांना आपल्या पर्समधील रोख १० हजार ६० रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. घुडे यांनी याबाबत संशयित म्हणून कलावती जाधव यांच्याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी जाधव हिची चौकशी केली असता, तिने उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिल्याने पोलिसांनी तिला सोमवारी अटक केली.