चिपळूण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी पदभार स्वीकारून कामासही सुरुवात केली. दरम्यान, सभापतींच्या गाडीवरील चालकाची बदली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गाडीवर झाली. सभापतींना बदली चालक देण्यात आला. तोही रजेवर गेल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. चालकाच्या समस्येवर लवकरच तोडगा निघेल, असा दावा पंचायत समिती प्रशासनाने केला आहे.
चिपळूण पंचायत समितीत सभापती, गटविकास अधिकारी आणि महिला व बालकल्याण विभागाकडे शासकीय वाहने आहेत. या तिन्ही गाड्यांवर नियमीतपणे चालक होते, त्यामुळे कोणतीही समस्या नव्हती. दरम्यान, सभापती रिया कांबळे यांच्या गाडीवरील चालकाची बदली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या गाडीवर झाली आहे. यावर पर्याय म्हणून सभापतींच्या गाडीवर महिला बाकल्याणच्या चालकाची बदली करण्यात आली. मात्र, बदलीनंतर ते आजारी असल्याने रजेवर गेले आहेत. चालक नसल्याने सभापतींची गाडी थांबून आहे. सभापतींना विविध शासकीय तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना निमंत्रण असते. गाडीवर चालक नसल्याने त्यांना संबंधित कार्यक्रमास जाता आले नाही. त्यामुळे चालक त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, असा विश्वास गटविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.