खेड : हळद लागवडीबरोबरच काळा तांदूळ व लाल सडीचा तांदूळ या भात बियाणांचीही लागवड केली जाणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, खेड व मंडणगड पंचायत समिती सेस फंड, जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे यांच्या माध्यमातून यासाठी तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.
याबाबत आमदार कदम म्हणाले की, दापोली कृषी विद्यापीठाकडून हळद प्रक्रिया युनिटचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. हळद म्हणजे पिवळे सोने आहे. हळदीपासून आर्थिक लाभ शेतकरी बांधवांना व्हावा, अशी माझी भूमिका आहे. हळद लागवडीसाठी विधानसभा मतदारसंघात तीनही तालुक्यांत हळद बियाणे व रोपे यांचे वाटप करण्यात आले आहे. हळद लागवडीबरोबरच काळा तांदूळ व लाल सडीचा तांदूळ या भात बियाणांचीही लागवड केली जाणार आहे. त्याचेही वाटप करण्यात आल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.