दापोली : आपल्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यात आलेला आहे, त्याला आपण खुल्यादिलाने सामोरे जाणार असल्याचे दापोली पंचायत समितीचे सभापती रउफ हजवानी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसाकडे साऱ्यांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.
दापोली पंचायत समितीचे विद्यमान सभापती हजवानी हे राष्ट्रवादीचे सभापती आहेत; मात्र त्यांनी आपल्या सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा देण्यास नकार दिला व शिवसेनेशी जवळीक साधली. यामुळे हजवानी अडीच वर्षे पूर्ण करतील आणि निवडणुकीला सामोरे जातील, अशी अटकळ बांधली जात होती; मात्र पंचायत समितीमध्ये काही तरी वेगळे शिजत होते.
यांच्या पत्नीने यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला हाेता. यामुळे हजवानी यांची शिवसेनेशी जवळीक वाढली. त्यांच्या आजूबाजूला राष्ट्रवादीचे नव्हे तर शिवसेनेचे कार्यकर्ते दिसू लागले होते; मात्र तरीही पंचायत समितीचे विद्यमान गटनेते मनोज भांबिड यांनी व इतर सदस्यांनी त्यांच्या सभापती यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची नोटीस जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना केली आहे.
याबाबत बोलताना हजवानी म्हणाले की, पंचायत समितीमध्ये आपण अत्यंत स्वच्छ व पारदर्शक काम करत आहोत. आपण कोणाचाही चहादेखील घेत नाही. हेच सर्वांना खटकत आहे. आपल्याला चुकीचे काम करण्यासाठी भरीस घातले जात आहे; मात्र आपण चुकीचे काम कधी केले नाही व यापुढेदेखील करणार नाही. हे सर्व सदस्यांना समजून आलेले आहे. म्हणून त्यांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणला असेल. आपण या ठरावाला सामोरे जाणार आहोत. आपण पळपुटी भूमिका घेणार नाही, असे सांगितले.