खेड : राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त शहराचा दौरा करताना आलेल्या आपत्तीचा अभ्यास करून एक तत्काळ धोरणात्मक निर्णय घेत शहराच्या लोकसंख्येनुसार शहर स्वच्छतेसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला हाेता. या निधीचा वापर शहर स्वच्छतेबरोबरच पाणीपुरवठा योजनेतील अद्ययावत जनरेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या खेड शहराला एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. या दौऱ्यात राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आमदार रामदास कदम, आमदार योगेश कदम यांच्या मागणीनुसार पालिकेला शहर स्वच्छतेसाठी दिलेल्या एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. या निधीतून शहर स्वच्छतेबरोबरच नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी जनरेटर खरेदी करण्यात येणार आहे. पूरपरिस्थिती, वादळ अशा आपत्कालीन परिस्थितीत अनेक तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा करताना प्रशासनाचा फार वेळ जातो. अशा वेळी पाणीपुरवठ्यात अनियमितता येऊ नये यासाठी दोन स्वतंत्र जनरेटरची आवश्यकता आहे. एक कोटीतील जवळपास चाळीस टक्के रक्कम जनरेटर खरेदीसाठी खर्च करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सुनील दरेकर यांनी दिली.