लांजा : लांजा - राजापूर - साखरपा विधानसभा मतदार संघामध्ये कोण विजयी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले असतानाच कोणत्या गावाने आपल्याला धोका दिला. कुणी काम केली नाही, कोण फुटला, कोण जवळ आला, याविषयीच्या चर्चा सध्या नाक्यानाक्यावर ऐकायला मिळत आहेत.विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत. लांजा - राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये यंदा चांगले मतदान झाले आहे. झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन आपल्या पक्षातील उमेदवाराला किती मताधिक्य मिळेल, याचे अंदाज कार्यकर्ते, पदाधिकारी घेत आहेत. तसेच कोणत्या गावाने आपणाला मताधिक्य दिले, कोणी विरोधात काम केले, कोण फुटला, कोण जवळ आला, यांची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे. आपला उमेदवार व आपल्या पक्षाला जास्तीत जास्त कसे मतदान मिळेल, यासाठी करण्यात आलेली धडपड, त्यावेळी झालेल्या गमतीजमती कार्यकर्ते एकमेकांना सांगून आपला विरंगुळा करत आहेत. रविवारी मतमोजणी होणार असल्याने मतदार राजाने काय करामत केली आहे, हे स्पष्ट होणार असल्याने सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत. कार्यकर्त्यांनी पैजा लावल्या असून, शांततेत पार पडलेल्या मतदानाने अनेकांचे अंदाज चुकतील काय, हा एकच प्रश्न प्रत्येकासमोर असणार आहे. (प्रतिनिधी)
जोडला कोण, फुटला कोण?
By admin | Updated: October 17, 2014 22:54 IST