रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची स्थिती भयावह आहे, ही बाब कोणी अमान्य करणार नाही. टेलिफोन केबल, पाणी योजना, गॅससाठी खोदण्यात आलेले चर आणि तुफान पाऊस यामुळे यावर्षी अधिक खड्डे पडले आहेत. पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रत्नागिरीतील रस्ते चकाचक केले जातील, हे मी आधी सांगितले आहे आणि तो माझा रत्नागिरीकरांसाठी शब्द आहे, असे उद्गार उच्च व मंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले.
गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी रस्त्यांबाबत बोलतानाच विरोधकांवर टीकाही केली. आपल्या जुन्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. त्यात आपण जे सांगितले, त्यावर आपण ठाम आहोत. रत्नागिरीतील रस्ते चकाचक होतील, यात शंकाच नाही. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रस्ते केले जातील, यावर आपण आजही ठाम आहोत, असे ते म्हणाले. मात्र हे रत्नागिरीच्या संस्कृतीला साजेसे राजकारण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता लागली तरीही रत्नागिरी शहरातील कोणतीही कामे अडणार नाहीत. तब्बल ५६ कामांच्या वर्कऑर्डर तयार आहेत. त्यासाठी निधी मंजूर आहे. आता फक्त पावसाळा संपण्याची प्रतीक्षा आहे, असे ते म्हणाले.