लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ही लढाई केवळ एका तालुक्याची न राहता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची व्हावी. यासाठी प्रचंड मोठे आंदोलन उभे करण्यासाठी सज्ज रहा, असे ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी सांगितले. या प्रश्नांसाठी येत्या ऑक्टोबरमध्ये संपूर्ण जिल्ह्यात ओबीसींचे मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार सभेत घेण्यात आला. वेळप्रसंगी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरण्याचा निर्णय रत्नागिरी येथे झालेल्या ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
ओबीसी संघर्ष समिती रत्नागिरी तालुक्याच्यावतीने येथील शासकीय विश्रामगृह येथे विचारविनियम सभा पार पडली. या सभेला ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते, राज्य ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, तसेच समितीचे शरदचंद्र गीते (देवरुख), कुमार शेट्ये, राजू कीर, दीपक राऊत, रूपेंद्र शिवलकर, सुरेश भायजे, सुहास वासावे, रघुवीर शेलार, भाई पोस्टुरे (मंडणगड), रवींद्र घडवले (माजी पोलीस आयुक्त, मुंबई), प्रकाश ऊर्फ बावा साळवी, महेश म्हाप, मंगेश साळवी, साक्षी रावणंग, वसंत घडशी, स्नेहा चव्हाण, संदीप ऊर्फ बावा नाचणकर, संध्या कोसुंबकर उपस्थित होते.
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना, आरक्षणाबाबत झालेला अन्याय व ओबीसी समाजाच्या समस्यांबाबतीत या सभेत उपस्थित मान्यवरांनी आपापली मते मांडली. शासनाला जाब विचारण्याची वेळ आल्याचे या वेळी उपस्थितांनी सांगितले. ओबीसींचे संघटन मजबूत करण्यासाठी आता सर्वांनी एकत्रित येऊन लढा उभारण्यासाठी सज्ज राहण्याचे प्रतिपादन ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केले.
यासाठी तालुका संघटनेने जोर धरला आहे. याविषयी संपूर्ण जिह्यातील ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन संघटना बांधणी व पुढील ध्येयधोरणे निश्चित करण्यासाठी जिल्हाभरातून ओबीसी समाजाचे नेतृत्व केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात आणखीन एक मध्यवर्ती ठिकाणी या संघर्ष समितीची बैठक घेतली जाणार आहे. जिल्हा ओबीसी समाजाच्या या सभेला ओबीसी संघर्ष समिती तालुका रत्नागिरी पदाधिकारी व सदस्य, तालुक्यातील सर्व समाजाचे अध्यक्ष, ओबीसी नेते, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, महिला उपस्थित होते.