मंडणगड : पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याने वलौते बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी मंडणगड तहसील कार्यालयात ९ एप्रिल २०२१ रोजी निवेदन दिले आहे. हा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनातील माहितीनुसार ग्रामपंचायत वलौतेतर्फे वलौते बौद्धवाडी या ठिकाणी नळपाणी योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरवण्यात येते. परंतु, गुरुवार, ८ एप्रिल २०२१ पासून हे पिण्याचे पाणी जाणीवपूर्वक देण्याचे बंद करून येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. फक्त बौद्धवाडीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. या प्रकऱणाची गांभिर्याने दखल घेऊन पिण्याचे पाणी तातडीने सुरू करून होणारा अन्याय दूर करावा. अन्यथा पिण्याचे पाणी मिळविण्याच्या मूलभूत अधिकारासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या अर्जाची एक प्रत मंडणगडचे गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, वलाैते ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडेही देण्यात आली आहे.